top of page

बाबाची बैलगाडी

होती साख-या आन् पाख-याची देखणी खिल्लारी जोडी.... समद्यात न्यारी जिवाला या प्यारी होती माझ्या बाबाची बैलगाडी.... असायच गाडीला नेहमी जुनच तुटलेल 'येटाक'.... संसारच आमच्य सवरत होत ते मोडलेल पेकाट .... सांधलेलीच आसाययची ती 'जुंपण्याची‘ जोडी.. माझ्या बाबाची बैलगाडी..... भार आमच्या गरिबीचा लादायाची पाठी...... गाडीची मोडकी ती थकलेली 'साठी'..... लेखू नका कमी कुणा सांगायची चाकाच्या 'कूणीं'ची जोडी.....माझ्या बाबाची बैलगाडी...... छुनूक छूनूक नाद घुंगराचा करायची तिकडी वाकडी काठी ती साधी... सटाक फटाक आवाज करत हवेत फिरायची चाबकाची 'वादी'.... हाकेवर एका झेप घ्यायची खिल्लारी ती जोडी..... माझ्या बाबाची बैलगाडी.... असेल जिद्द आसेल चिकाटी तुम्हा हवा कशाला सांगा देव... हेच सांगत होती आम्हा जणू निसटलेल्या 'पुट्यांना' सांभाळणारी 'धाव'......

कष्टाच्या फळाची चव येगळी न्यारीच त्याची ती गोडी.... माझ्या बाबाची बैलगाडी......नाही सोडायचा धीर कधी जरी झिझली सारी हाडं .....हेच सांगत होत जणू त्या गाडीच मोडक 'बावकाड'.... बाबाच्या बाजूला माय बसायची शंकर- पार्वतीची जशी जोडी....माझ्या बाबाची बैलगाडी...... गावाच्या वेशीत 'मेंडवाड्या,'च्या कुशीत संध्याकाळी यायची जवा ती गाडी... जिवाच म्हैतर 'पांडान' अन् 'सुदमा' पेटवून तयार ठेवायची बिडी...... जिवाभावाच म्हैतर होते होती न्यारीच त्यांच्यात गोडी..... माझ्या बाबाची बैलगाडी..... "साख-या-पाख-याची" जोडी ती गेली मोडक्या त्या गाडीचा सांगाडाही गेला.... "बेंदाड जगू" "पिसाळाचा पांडा" "कंटुरवाला" गेला सोडून बाबांना तो ''बापू दाडीवाला".. माणसं बदलली घरबदलली तरी आहे तशीच ती.."जखिन वाडी"..... माझ्या बाबाची ती बैलगाडी.......

bottom of page